Wednesday, September 24, 2025

वसई किल्ला सफर


वसई किल्ला सफर (रविवार, ७ सप्टेंबर २०२५)
 
आयोजक: WeRovers, इतिहासाच्या पाऊलखुणा 
मार्गदर्शक आणि इतिहासतज्ञ: वसई पुत्र श्रेयस जोशी 

७ सप्टेंबर रोजी भल्या सकाळी वसई किल्ला सफरसाठी येणारे आम्ही, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून पावसाची तमा न बाळगता वसई स्टेशन वर पोचलो. बाहेर तुफान पाऊस चालूच होता. टपकत्या छत्रीखाली आपले बूड घेऊन मी सांगितल्याप्रमाणे हरिद्वार हॉटेल समोर, वसई किल्ल्याला जाणाऱ्या बस थांब्यापाशी ठीक सकाळी ८ वाजता येऊन थांबलो. बाकीचे यायला वेळ होता म्हणून बाजूच्याच हॉटेलमध्ये गरमागरम इडली सांबर नाश्ता रिचवला. रस्त्यापलीकडे एक चहाचे दुकान दिसले, मग मोर्चा तिकडे वळवला आणि धो धो पडणाऱ्या पावसाची मजा घेत घोट घोट चहा ची मजा घेतली. एवढ्यात फोन आला की अनुराग रिक्षा घेऊन हरिद्वार हॉटेल पाशी येईल. आणि ५ मिनिटातच अनुराग तिथे हजर. 

वसई रेल्वे स्टेशन बाहेर हॉटेल हरिद्वार समोरून वसई किल्ल्याकडे जाणाऱ्या हिरव्या रंगाच्या बस सुटतात

वसई शहर बघत बघत अर्ध्या तासात, ९ वाजता, आम्ही वसई किल्ल्याबाहेर पोचलो. इतक्यात ऍक्टिवा वर एक ३/४थ घातलेला इसम आमच्यामागेच तिथे आला. रिंगण केले आणि डॉ सागर यांनी आयोजक संस्थांचा परिचय करून दिला. इतका वेळ हा ३/४थ घातलेला डॉ सागरच्या बाजूला शांतपणे उभा होता. मध्येच आपल्या लांब टोकाच्या छत्रीने बाजूला असलेल्या कुत्र्याला आणखी बाजूला सरकवावे वगैरे असे त्याचे उद्योग चालू होते. परिचय संपवून डॉ सागर यांनी बाजूला उभा असलेल्या इसमाची ओळख करून दिली “हा आहे श्रेयस जोशी, ज्याने तब्बल एक नाही दोन नाही तर ३०० वेळा वसई किल्ला सफरींना मार्गदर्शन केले आहे आणि आता ओव्हर अँड आऊट टू श्रेयस!” 

डॉ सागर पाध्ये WeRovers, इतिहासाच्या पाऊलखुणा आणि श्रेयस जोशी यांचा परिचय करून देताना

या क्षणापासून पुढचे ६ तास श्रेयस जोशी यांनी अक्षरशः वसई किल्ल्याचीच नाही तर वसई गाव, ख्रिश्चन पॉलिटिक्स, किल्ल्यातली झाडे, फळे, वसईतील लोकांचे व्ययसाय, पोर्तुगीज सत्तेचा इतिहास-अमानुष अत्याचार-रणनीती या आणि अनेक वेगवेगळ्या विषयांच्या माहितीचा स्रोत चालूच ठेवला. वरून धो धो पाऊस पडत होता आणि खाली भूतलावर श्रेयस यांच्या मुखातून धो धो ज्ञानाचा सागर वाहत होता. इतिहास प्रेमाला अभ्यासाची जोड मिळाली की मग तयार होतात श्रेयस यांच्यासारखे इतिहास रंगवून सांगणारे हिरे! 

वज्रेश्वरी देवी देऊळ 
तर वसई किल्ला सफरची सुरुवात झाली वज्रेश्वरी देवी देऊळापासून. बाहेरून देवळाचा कळस जुन्या दगडी देवळांच्या कळसासारखा दिसत होता पण अंगाचे आधुनिकीकरण झालेलं साफ दिसत होतं. हे होतं पेशवेकालीन वज्रेश्वरी देवी देऊळ जे वसई किल्ल्यात स्थित आहे. 

याची गोष्ट अशी... चिमाजी अप्पा यांनी देवीकडे प्रार्थना केली की जर वसई किल्ला जिंकला तर देवीचे देऊळ बांधेन. त्याप्रमाणे पोर्तुगीजांना वसईतून हाकलून लावल्यावर व वसईतील हिंदूंना क्रिस्ती पाद्रींच्या अमानुष अत्याचारातून मुक्त केल्यावर चिमाजी अप्पांनी हे देऊळ बांधले. 










आतील गाभारा पेशवेकालीन आहे. बाहेर हल्लीच्या काळात बरेच बांधकाम केले गेले असल्याचे दिसते. देऊळासमोरच सिमेंट फरशी असलेले मोठं पटांगण आहे. श्रेयस यांनी त्यांच्या लहानपणाची आठवण सांगितली की देवळासमोर एक सुंदर बारव होती. आणि काही वर्षांपुर्वी गावकऱ्यांनी सुशोभीकरण नावाखाली बुजवून टाकली. आजकाल अनेक देवळात हे नवीन फॅड निघालेलं दिसतं. प्राचीन दगडी भिंतींवर, खांबांवर बटबटीत ऑइल पेंट फासून त्याचे विद्रुपीकरण करायचं आणि देवळाची प्राचीन ओळख पूर्ण पुसून टाकायची. 
बारव बुजवून सिमेंट फरशी टाकणे हा त्यातलाच एक प्रकार. 


संरक्षण पण कमकुवत 
मध्येच श्रेयस यांनी डावीकडे हात दाखवला. वज्रेश्वरी देऊळाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या साठ्यापलीकडे काही दगडी बांधकाम दिसत होते. त्याने सांगितले की हा इकडे दिसतोय तो जुना वसई किल्ला जो आगरी लोकांनी बांधला. एक रंजक गोष्ट अशी की पोर्तुगीज लोकांनी या किल्ल्याला सर्वात कमकुवत किल्ला असे संबोधले होते. खूप झाडी वाढल्यामुळे आम्हाला हा किल्ला कसा आहे ते दिसलेच नाही आणि कमकुवत का समजला गेला हे ही कळू शकले नाही. 

हाच तो सर्वात कमकुवत किल्ला

देवळासमोर डांबरी रस्ता ओलांडला की एक पडीक दगडी वास्तू उभी दिसते. ही पोर्तुगीज कचेरी होती असे समजले. पाश्चमात्य बांधकाम हे बघूनच त्यातला वेगळेणा दिसतो. मोठमोठ्या कमानी हे त्यांचे एक वैशीष्ट्य. तसेच मुख्य द्वारावर ख्रिश्चन खुणा या हमखास दिसतात. गवत खूप वाढल्यामुळे आणि पाणी साचल्यामुळे आम्हाला आत जात आले नाही. सापांचा धोका! 

हे चिन्ह म्हणते ख्रिश्चन पोर्तुगीज सत्ता पूर्ण पृथ्वी वर राज्य करेल


डावीकडे एक पोर्तुगीज काळातलीच मोठी दगडी इमारत उभी दिसली. त्याच्या खिडक्या लांब लचक होत्या. याचे कारण की पोर्तुगीज नंतर वसई किल्ला चिमाजी अप्पांनी मराठा साम्राज्यात आणला. मराठी सत्ता अस्तानंतर इंग्रजांनी या अशा इमारतींचे रूपांतर साखर कारखान्यात केले. आणि वसई मध्ये साखर कारखाना असण्याचे कारण म्हणजे वसईच्या आसपास त्याकाळी ऊस खूप उगवायचा. 




काही वेळाने किल्ल्याच्या पोटात शिरल्यावर श्रेयस यांनी एक दगडी उसाची मळी ही दाखवली. हे एक मोठे दगडाचे भांडे होते ज्यात उसाचा रस गरम केला जायचा आणि एका बाजूला दगडी पाईप सारखे रस बाहेर येण्यासाठी वाट केलेली होती. परत झाडी खूप वाढल्यामुळे ही वाट निसर्गाने गुडूप केली होती. 

पाणीच पाणी 
आता रस्ता संपला आणि आम्ही किल्ल्याच्या पोटात प्रवेश केला. श्रेयसच्या मनात एक शंका डोकावत असलेली जाणवली. गेले काही दिवस वसई मध्ये खूप पाऊस झाल्यामुळे किल्ल्यातही पाणी भरले होते. अशा पाण्यातून आम्ही शहरी लोक चालू शकू का आणि किल्ला भटकंती शक्य होईल का? पण कोणीही हूं की चूं केले नाही आणि आनंदाने पाण्यात स्वतः ला झोकून दिले. इतक्या लांब वसईला आलो होतो तरी कशाला? एवढयाशा पाण्याला घाबरून निमूटपणे परत फिरणाऱ्यातले आम्ही नाही. कदापि नाही! मग कधी चिखलातून तर कधी गुडघाभर पाण्यातून, कधी पायवाटेवरून तर कधी डबक्यातून अशी आमची वसई सफर चालू राहिली आणि श्रेयस यांच्या मुखातून पदोपदी होणाऱ्या ज्ञानाच्या वर्षावातून जमेल तेवढे ज्ञानाचे मोती वेचून आपल्या मेंदूत साठवून ठेवणे हे कार्य दिवसभर चालूच राहिले.







आद्या 
आमच्या चमूमध्ये आपल्या आई बाबांबरोबर आलेली एक चिमुकली पोरही होती. तिचं नाव आद्या. सर्वात धम्माल कोणी केली असेल तर आद्याने! गवताची परवा नाही, पाण्यातून चालण्यासाठी कुरकुर नाही. हे तर सोडा, दिवसभर आम्ही चालत होतो पण एकदाही रडणे नाही, कंटाळणे नाही की आई बाबांच्या मागे “लवकर घरी चला ना” असा तगादा नाही. 

पाणी दिसलं की मनसोक्त डुंबायचं. चिखल, माती दिसली की जीव ओतून त्यात खेळायचं आणि प्रत्येक क्षणातला आनंद निरागसपणे वेचायचं एवढच तिला माहीत. आणि त्यातून वेळ उरलाच तर निरंतर आई बाबांना प्रश्न विचारायचे हा उद्योग ठरलेला! 


पण आद्याच्या या स्वछंदपणे बागडण्याच्या वृत्तीचे श्रेय तिच्या आई बाबांना द्यायला हवे. भिजली तर भिजू दे. पाण्यात खेळत आहे, खेळू दे. फार फार तर काय नंतर तिचे कपडे बदलू. यात बाबांचे काम तिच्यावर लक्ष ठेवणे आणि तिच्या मागे धावणे. आणि आईचे काम बाबांना न टोकणे आणि आद्याला हे नको करू, ते नको करू याची बंधने न घालणे! 

Hats Off टू आद्या आणि तिचे आई बाबा! 



पोर्तुगीज नराधम 
असं म्हणतात की इंग्रज हे कितीही शोषणकर्ता असले तरी इतर पाश्चिमात्य सत्तांपेक्षा जास्त सहिष्णू होते. आता पोर्तुगीजच बघा ना. सागरी मार्गाने, आपल्या तुल्यबळ आरमाराच्या बळावर त्यांनी हिंदुस्तानात शिरकाव केला. किनाऱ्यावरचे वसई, गोवा इथे स्थानिक सत्तांशी संधान बांधून नंतर हे परिसर आपल्या ताब्यात घेतले.इथेच न थांबता त्यांचे मुख्य ध्येय त्यांनी ताबडतोब राबवायला सुरुवात केली. समाजाचे धर्मांतर करणे! आणि कसे? तर जोर जबरदस्तीने. हिंदू धर्म बदलून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर नाहीतर सुळावर चढण्यास तयार रहा. पोर्तुगाल वरून पादरी लोक हिंदुस्तानच्या सुपीक जमिनीवर अवतरले आणि हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचार सुरु केले. 




एक उदाहरण - श्रेयस यांनी ज्ञात केले की कसे पोर्तुगीज पाद्री हिंदू लोकांचा छळ करायचे. एक गोणपाट घ्यायचे. त्याला मधोमध एक वर्तुळाकार छेद करायचे. ते गोणपाट तेलात बुचकळून काढायचे आणि जो हिंदू धर्मांतर करण्यास नकार देईल त्याच्या डोक्यातून गळ्यात तो तेलाने ओला चिंब गोणपाट घालायचे आणि तो पेटवून द्यायचे. विचार करा एक गोणपाट किती तेल शोषू शकतो. एवढे तेल एका माणसाच्या अंगावर ओतले आणि पेटवले तर त्या माणसाचे काय हाल होतील. 


हा तर झाला एक प्रकार. हात पाय तोंडाने, जीभ हासडणे, आंधळं करणे हे ख्रिश्चन पाद्री लोकांच्या नीच, अमानुष कृत्यांपैकी काही. यापैकी दोन तीन पाद्रींचे चर्च वसई किल्ल्याच्या आवारात आहेत. एक आहे फ्रान्सिस्कन चर्च ज्यात ऍंथोनी नावाचा पाद्री राज्य करायचा आणि धर्मांतर कृत्य करायचा. मुंबईतील प्रख्यात St. Xavier’s हे अशाच एका Xavier नावाच्या गोवा मधील पाद्रीच्या काळ्या धर्मांतर कृत्याच्या प्रेरणार्थ स्थापन केलेले कॉलेज आहे. 

याच Xavier चे प्रेत जुन्या गोव्यातील Basilica of Bom Jesus चर्च मध्ये ठेवले आहे असे मानतात आणि दर वर्षी लाखो हिंदू पर्यटक अशा हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या आणि नरसंहार करणाऱ्या पदरीला आवर्जून पर्यटनाच्या नावाखाली भेट देऊन येतात. 

अधांतरी जिना 
वसई किल्ल्यात अँटोनियो चर्च मध्ये श्रेयसच्या कृपेने आम्हाला एक अद्भुत जिना बघायला आणि चढायला मिळाला. कारण एका घंटाघरात असणारा, वर जाणारा हा गोलाकार जिना अशा अद्भुत प्रकारे बांधला गेला आहे की जिन्याचा अभ्यास करायला वास्तुकलेचे विद्यार्थी, उत्सुक लोक आणि तज्ञ् मंडळी येऊन गेली आहेत. 


जिना चढून वर गेले की वसई खाडीचा निसर्गरम्य दृश्य नजरेस पडते. जरा डोळे छोटे करून खाडीच्या पलीकडे टक लावून बघितलं की गोराईचा सोनेरी पागोडा ही दिसतो. 


मान थोडी खाली केली की वसई धक्क्यावर हेलकावे खात उभ्या अनेक मासेमारी नौका पहुडलेल्या दिसतात. एकूणच या घंटाघरतून दिसणारे विलोभनीय दृश्य बघण्यासारखे आहे. 

घंटाघर

तो वर्तुळाकार जिना सावकाश उतरल्यावर खाली वाकून पटांगणात यावे लागते, नाहीतर ४०० वर्षांपूर्वीच्या पाषाणावर कपाळमोक्षाचा प्रसाद घेऊनच बाहेर पडावे लागते. 

ख्रिस्ती देवदूत - पोर्तुगीज कल्पना 
हा गोलाकार जिना उतरून डाव्या बाजूला वळले की एक खोली लागते. मान वर करून अगदी पाठीला टेकवली की त्या खोलीच्या छतावर पांढऱ्या रंगाने काढलेल्या रेशांचे नक्षीकाम आढळते. श्रेयसने आम्हाला कोडं घातलं की या रेषांच्या जंजाळात स्त्री देवदूत आहेत ते शोधून दाखवा. मान वाकडी करून कळ येईपर्यंत निरखून बघितलं आणि एक मुलीचा चेहरा रेषांच्या आड डोकावत असलेला नजरेस पडला. श्रेयस म्हणाला की असे आणखी चेहरे आहेत, आणि एकामागून एक आमच्याकडे बघणारे मुलींचे चेहरे दिसायला लागले. 

या खोलीचे उद्धिष्ट असे की स्त्री देवदूत स्वर्गातून तुमचे रक्षण करत आहेत अशी समजूत पोर्तुगीज आणि ख्रिश्चन समाजात होती.

दिसली का ख्रिस्ती देवदूत खाली डोकावताना?

डॉ सागर ज्ञान - रामायण चे महाभारत 
वसई किल्ल्यात चांगली ४ तास भटकंती चालू होती आणि याची जाणीव झाली जेव्हा आम्ही वज्रेश्वरी देवळात जेवण करण्यासाठी आसनस्थ झालो. गेले ४ तास आम्ही गवत तुडवत, पाणी- चिखल मधून वाट काढत किल्ला बघत होतो. पण साचलेल्या पाण्यामुळे आणि रानटी गवतामुळे अजून अर्धा किल्लाही बघितला गेला नव्हता. 

दुपारी जेवणासाठी ब्रेक घेतला गेला. खरंतर हा ब्रेक श्रेयस साठी होता आणि झाले असे की या ब्रेकमध्ये डॉ सागरने नवीन आघाडी उघडली. जेवता जेवता विषय निघत गेले आणि डॉ सागर यांनी ज्ञानाचे आणखी काही दरवाजे उघडून दिले. विषय होता रामायण, महाभारत मधील प्रत्यक्ष युद्ध. डॉ सागर ने सांगितले की त्या काळात बाण हे मुख्यतः बांबू पासून बनवले जायचे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाणाचेही अनेक प्रकार होते. लाकडी बाण तर होतेच पण त्याहीपेक्षा सक्षम म्हणजे लोखंडी बाण. पण हे धातूचे बाण हाताळणे सोपे नाही. जो योद्धा शक्तिमान आहे आणि ज्याचे तंत्र अचूक आहे तोच हे धातूचे बाण वापरू शकायचा. उदाहरण म्हणजे अर्जुन. आणि म्हणूनच अर्जुनाचे बाण एवढे घातक होते आणि तो श्रेष्ठ धनुर्धर म्हणून पुढे आला. यामुळेच १०-१५ लाकडी मारले तरी शत्रुसैनिक नुसता जखमी व्हायचा पण मरायचा नाही, पण एक धातूचा बाण मारला की लक्ष्य भेदले गेले असल्याची खात्री! इथेच एकलव्य ची गोष्टही निघाली. डॉ सागर मताप्रमाणे एकलव्याचा अंगठा कापला गेला होता म्हणून तो धनुष्य बाण चालवू शकत नव्हता यात काही तथ्य नाही. कारण लाकडी बाणाचा स्पर्श धातूच्या बाणाहून वेगळा असतो. 

त्यामुळे योद्धा जेव्हा पाठीवर असलेल्या बाणांच्या भात्यात हात घालतो तेव्हा फक्त बोटांच्या स्पर्शाने त्याच्या लक्षात यायचे की हा लाकडी बाण आहे की धातूचा. डॉ सागर यांनी हाताची हालचाल करून प्रात्यक्षिकही दिले की कसे अंगठा आणि तर्जनी ने बाण मारल्यास बाण लांब जात नाही आणि ती योग्य पद्धतही नाही. धनुर्धर नेहमी तर्जनी आणि माध्यम बोटांनीच बाण प्रत्यंचावर चढवतात आणि या दोन बोटांनीच लक्ष्याचा वेध घेण्यासाठी बाण सोडतात. या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता की युद्ध कशा प्रकारे लढली जात असतील. डॉ सागर यांनी अकस्मितपणे एका वेगळ्या विषयाची माहिती दिली आणि आम्ही ज्ञानार्जन केले.

दहापैकी एकाच बुरुजावर जाणे शक्य होते आणि ही संधी कोण सोडणार!

चिमाजी अप्पा आणि पोर्तुगीज युद्ध 
वसई मधील वजनदार स्थानिक लोकांनी अजिंक्य बाजीराव पेश्वायांकडे तक्रार आणि विनवणी केली. आम्हाला पोर्तुगीज सत्तेच्या अमानुष अत्याचारांपासून वाचावा आणि मानाचे आयुष्य जगण्यास मदत करा. हिंदूंवरील अत्याचार पेशव्याच्या कानावर येत होतेच. या अत्याचारी पोर्तुगीजांना कायमचे वसईतून हुसकावून लावायचा बेत पक्का ठरला. या मोहिमेसाठी स्वतः अजिंक्य बाजीराव पेशव्याचे सक्खे लहान भाऊ चिमाजीराव अप्पा यांची निवड झाली. 


आता वसई किल्ला जिंकणे एवढे अवघड का होते? एक तर पोर्तुगीज ही पाश्चिमात्य सत्ता तंत्रज्ञानात हिंदुस्थानी सत्तांपेक्षा वरचढ होती. त्यांचे सागरी सामर्थ्य कैक पटीने प्रबळ होते. पण सर्वात महत्वाची बाजू म्हणजे वसई किल्ला हा तीन बाजूंनी पाण्याने, समुद्राने वेढला आहे. याचा अर्थ पाण्याचे नैसर्गिक संरक्षण त्याला लाभले. म्हणून पाण्याच्या बाजूची तटबंदी कमकुवत म्हणता येणार नाही पण नेहमीच्या तटबंदी पेक्षा कमी रुंदीची आणि कमी उंचीची बांधली गेली कारण समुद्रातून पोर्तुगीजांना शह देणारी दुसरी सत्ता त्यावेळी कोणी नव्हती. पण एक बाजू जी जमिनीच्या दिशेने होती तिथे हीच तटबंदी ८-१० फूट रुंद दगडी बांधकाम असलेली भक्कम तटबंदी होती. 

वसई पर्यंत पोहोचायला वाटेत अनेक नद्या लागतात. जेव्हा चिमाजी अप्पा वसईच्या नजीक आले आणि नद्या ओलांडायची वेळ आली तेव्हा स्थानिक नावाडी लोकांनी पोर्तुगीजांच्या भीतीने मराठ्यांना नावा देण्याचे नाकारले. अशा परिस्थितीत फौजेला झाडे कापून त्यांचा पूल करावा लागला आणि मगच नदी पार करता यायची. हे खूप वेळखाऊ काम होऊन बसले होते. 

अजून एक गोष्ट म्हणजे मराठ्यांची लढण्याची पद्धत ही जलद हालचाल आणि घोडदळ यावर मुख्यतः केंद्रित होती. तोफा आणि तंत्रज्ञानावर भर असलेली निश्चितच नव्हती. आणि वसई मध्ये उभा ठाकला एक भक्कम तटबंदी असलेला किल्ला जो तीन बाजूंनी पाण्याने वेढला होता आणि ज्याचे संरक्षण बंदुका व तोफांनी सज्ज पोर्तुगीज करत होते. यामुळे चिमाजी अप्पांना तब्बल ३ वर्षे झुंजावे लागले तेव्हा वसई गाव आणि किल्ला हे दोन्ही दुष्ट पोर्तुगीजांच्या जाचातून मुक्त झाले. मराठांची मुख्य हत्यारे म्हणजे भाले, तलवारी, हलक्या तोफा आणि दारुगोळा. याने वसई किल्ला सर होणे अशक्य. मुख्य द्वाराबाहेरची भिंत बघितली तर मराठ्यांच्या तोफगोळ्यांनी झालेली छोटी भोके तटबंदीत अजूनही दिसतात. पण तेवढेच, छोटी भोकच. याहून जास्त हानी मराठ्यांच्या तोफा करू शकत नव्हत्या असे दिसते. गारद्यांचा तुल्यबळ तोफखाना मराठ्यांबरोबर यायला अजून बरीच वर्षे जायची होती. 

मग हा किल्ला सर कसा केला गेला? 
सुरुंग खणून एका बुरुजाखाली दारूगोळा भरलेली मडकी रचण्यात आली आणि त्याला बत्ती दिली. पण पावसात आणि त्या दलदल जमिनीत ही कामगिरी अत्यंत जोखीमीची होती. हा दारुगोळा रचत असतानाच अचानक स्फोट होऊन त्यात आपलेच सैनिक मारले जात. पण शर्थ करून मराठ्यांनी के काम पूर्ण केले आणि शेवटी दारूगोळ्यांनी हा बुरुज जमीनदोस्त केला गेला. तीन वर्ष झुंजून शेवटी या जागेतून मराठे किल्ल्यात शिरले आणि एकूण एक पोर्तुगीजांना किल्ल्यातून हुसकावून लावले. 


चिमाजी अप्पांच्या चिकाटीने आणि प्रयत्नांनी साल १७३९ मध्ये पहिल्यांदा कोकणातील वसई किल्ला आणि परिसर यावर भगवा फडकला. याचबरोबर तळ कोकण भाग ही मराठी साम्राज्यात सामील झाला आणि लाखो हिंदू लोकांचे प्राण वाचले आणि जबरदस्तीने होणारे ख्रिश्चन धर्मांतर थांबले. जे पोर्तुगीज वसईतून पळाले ते थेट गोवा मध्ये जाऊन विसावले, कारण तेव्हा गोवा मध्येही पोर्तुगीजांचीच सत्ता होती.

शूरवीर चिमाजी अप्पा


वसई खाद्य संस्कृती 
पाणी भरलं असल्यामुळे पोर्तुगीज सत्तेची कचेरी, कारागृह बहेरूनच बघणे झाले. दोन चर्च, पोर्तुगीज सत्तेचे चिन्ह, दगडी गुर्हाळ वगैरे बऱ्याच जुन्या वास्तू बघून झाल्या. शेवटी आम्ही एका चर्चच्या मागच्या बाजूला भव्य कमानी असलेल्या जागेत आलो. श्रेयस जोशी हे वसई पुत्र असल्यामुळे त्यांना लहानपणापासून वसई गावच्या अंतरंगाशी ओळख आणि मैत्री होती. वरून परत ते स्वतः Nutritionist असल्यामुळे कदाचित त्यांनी आपले मानस बोलून दाखवले. किल्ला सफर आणि माहिती सत्र हे त्यांनी आतापर्यंत एकदा दोनदा नव्हे ३०० वेळा केलं आहे. आता त्यांची इच्छा वसईमधील खाद्य संस्कृतीशी लोकांना ओळख करून द्यायची आहे. 

श्रेयस जोशी वसई खाद्य संस्कृती बद्दल माहिती देताना

वसईमध्ये पोर्तुगीज अनेक दशके असल्यामुळे स्थानिक संस्कृती आणि पोर्तुगीज संस्कृती यांचे काही प्रमाणात मिश्रण झालं आणि त्यातून काहीआगळेवेगळे पदार्थ उदयास आले. अर्थात त्यातल्या काही मध्ये पोर्क वापरले जाते. पण ते सोडूनही असे वेगळे दोन संस्कृती मिश्रित पदार्थ आहेत जे वसई बाहेरील खवय्या लोकांसाठी नावीन्यपूर्ण ठरतील. यांची ओळख करून देण्यासाठी श्रेयस जोशी उत्सुक होते आणि असा Walk आयोजित करण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. वसई गावाची वेगळीच खासियत माहिती झाली! 

वसई किल्ला प्रवेशद्वार 
'वसई किल्ला सफर' ची सांगता जिथून किल्ला सुरु होतो तिथे झाली. म्हणजेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. आतापर्यंत पाण्यातून, चिखलातून चालण्याची सवय झाली होती. तसंच पाण्यातून पाय ओढत ओढत आम्ही एका मारुती देवळापाशी आलो. तिथून रस्ता उजवीकडे वळत होता. चार पावले पुढे गेलो आणि प्रवेशद्वार समोर आले. नेमकं इथेच रस्त्यावर कचरा आणि घाण आढळली. इतर ठिकाणी पाणी साचल्यामुळे कोण मनुष्य फिरकत नसणार. जिथे फिरकतात तिथे घाण हे समीकरण ठरलेलं. जसं महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर होतं तसंच वसई किल्ल्यातही. 



गोरखचिंच झाडे

असो, प्रवेशद्वाराच्या बाजूलाच बुरुज होता आणि खाली भक्कम दगडी तटबंदी. कारण ही बाजू जमिनीची दिशेला होती. आधी सांगितल्याप्रमाणे बाजूची तटबंदी नीट बघितली की मध्ये मध्ये काही दगड तुटून छोटी खळगी झाल्याचे स्पष्ट दिसत होते. याच आहेत मराठ्यांच्या तोफगोळ्याच्या आठवणी. मराठ्यांच्या तोफा तटबंदीचे काहीही नुकसान करू शकल्या नाहीत. जिथे आपल्या हलक्या तोफांनी एक भिंतही पडली जात नव्हती, असा किल्ला सर करणे किती अवघड काम होते ते यावरूनच लक्षात येते. 



वसई किल्ला सर करणारी चिमाजी अप्पा आणि असंख्य मराठा शूर वीरांना मनाचे वंदन! 
तुम्ही होता म्हणून लाखो हिंदू हिंदूच राहिले! 

जय भवानी, जय शिवाजी! 
जय चिमाजी, जय बाजी! 

 - धवल रामतीर्थकर

WeRovers आणि इतिहासाच्या पाऊलखुणा यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली
'वसई किल्ला सफर' मधील उत्साही इतिहास प्रेमी