Wednesday, October 08, 2025

गप्पिष्ट आणि शिष्ट - एक ट्रेन गाथा

सौ यांची इच्छा झाली. त्याला श्री यांची भटकंतीची साथ मिळाली आणि जन्म झाला द्वारका दर्शन प्लॅनचा.
२ ऑक्टोबर २०२५ गुरुवार आला, आणि शुक्रवारची सुट्टी घेऊन आम्ही रेल्वेने दुपारी २ वाजता द्वारका पोहोचलो. 

द्वारका मध्ये पाऊल ठेवताच आठवणीत ठेवण्यासाठी सेल्फी तो बनता है ना

द्वारकाधीश देवळाबाहेर  एक क्षण. पावसाला सुरुवात झाली होती आणि
रात्रीपर्यंत पावसाने विश्रांती घेतलीच नाही


शीतलच्या ऑफिस मधल्या एका गुजराती सहचारीच्या ओळखीने आणि मदतीने संध्याकाळी तब्बल ३ तास आम्हाला द्वारकाधीश देवळात कृष्णाचा आणि द्वारकेचा इतिहास समजण्याचे भाग्य लाभले. 

द्वारकाधीश देवळाचा कोपरा न कोपरा दाखवणारे आणि त्याची माहिती देणारे
जास्मिन भट यांच्यासोबत एक आठवण म्हणून क्लीक

दुसऱ्या दिवशी द्वारका दर्शन बसने नागेश्वर ज्योतिर्लिंग, बेट द्वारका, रुक्मिणी देऊळ आणि गोपी तलाव या जागांचे दर्शन घेऊन झाले. ती एक वेगळीच गोष्ट आहे.

गोपी तलावात मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करताना. इथे १६० गोपींना कृष्णाने मोक्ष प्राप्त करून दिलं होतं.


सुंदर रुक्मिणी देऊळ.
देवळात शिरण्यापूर्वी तिथल्या पुजाऱ्याने गोड गुजराती शैलीत सर्वांना
पाण्यासाठी दान देण्याची याचना केली. मगच देवळात सोडले गेले.


१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक हे नागेश्वर ज्योतिर्लिंग. द्वारका पासून २० कि.मी. अंतरावर स्थित आहे.

भव्य शिव!

द्वारका मधला तिसरा दिवस उजाडला. आज दुपारी माघारी निघायचे होते. सकाळी निसर्गरम्य परिसरातील समुद्रकिनारी असलेले भडकेश्वर महादेव देऊळ इथे शंकराचे दर्शन घेऊन आलो. तिथला रुद्र समुद्र लक्षात राहण्यासारखा जाणवला. जणू त्याला दगडांनी अटकाव केलेला आवडला नसल्यामुळे खवळून आपली नापसंती दर्शवत होता आणि म्हणत होता की कितीही वेळ लागो, तप उलटो मी प्रयत्न चालूच ठेवणार जोपर्यंत मला माझी भूमी परत मिळत नाही.

समुद्राचा रुद्रावतार. खडकावर आपटून लाटेचे तुषार रागाने वर उडतात 



भडकेश्वर महादेव देऊळ येथील अजस्त्र शिवलिंग


शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४० ची सौराष्ट्र मेल वेळेत आली आणि आम्ही आमच्या आरक्षित आसनांवर स्थिरावलो. शीतलने सवयीप्रमाणे खिडकीच्या खाली आपल्या बॅगा ठेवल्या ज्यात खाण्याचे सामान आणि इतर लागणारे सामान होते. तेवढ्यात एक त्रिकुट तिथे आलं नवरा, बायको (४० वय) आणि वडील. सहापैकी तीन सीट आमच्या होत्या आणि दोन त्यांच्या. नवरा हट्टा कट्टा, सुधृद होता. येताच त्याने खिडकी खाली शीतलने ठेवलेल्या बॅग बघितल्या आणि क्षणाचाही विलंब न लावता तोंडाचा पट्टा सुरु केला.
"यह बॅग सीट के नीचे रख दीजीए ना. ऐसे रखेंगे तो पैर नीचे छोडने की जगह कहां मिलेगी. लांबी जर्नी है, ऐसे थोडी बैठ सकते है." मला त्याचे म्हणणे पटले. पण सौ यांच्यावर त्यांच्या मनाविरुद्ध बोलल्याचा आणि करायला सांगितल्याचा काय परिणाम होतो हे बघण्यासाठी मी शीतलकडे वळलो. तिने अनिच्छेने दोन पैकी एक बॅग सर्वात वरच्या सीटवर मला ठेवायला सांगितले. मी निमूटपणे सांगेल तसे केले.

पुढील अर्धा एक तास तसा शांततेत सरकला. त्या जोडप्याबरोबर त्या मुलाचे वयस्कर पण ताठ कण्याचे वडीलही होते. त्या एक तासात जाणवले की वडिलांना मुलाची आणि मुलाला वडिलांची खूप काळजी होती. बायको आलिप्तपणे खिडकीत बसली होती आणि तिचे फोनवर संभाषण चालू होतं. जसं प्रवासात नेहमी होतं तसंच या वेळीही झालं, कोणत्यातरी छोट्या वाक्याने मनोमिलनाला सुरुवात झाली. शीतल आणि त्या बाईचे अल्प संभाषण झाले आणि एकमेकांसमोर, एकमेकांमध्ये असलेली संकोचाची भिंत ओलांडली गेली. भिंत नाहीशी होताच संभाषण मुक्तपणे वाहू लागले. दुपारपर्यंत माझे आणि त्या माणसाचे मोकळेपणाने बोलणे सुरु झाले. 

वन फॉर दि ट्रेन


पहिला चुकलेला अंदाज

सुरुवातीला जेव्हा ते त्रिकुट रेल्वे डब्यात आले तेव्हा त्याच्या शरीरयष्टी कडे बघून आणि वागण्याच्या बोलण्याच्या तोरा बघून मला वाटलं होता की हे नॉर्थ इंडियन म्हणजेच दिल्ली वगैरे बाजूचे आहेत. त्यात परत ते हिंदी मध्ये बोलत होते. नवरा-बायको हिंदी आणि नवरा-वडील हे ही हिंदी मध्ये.

 जेव्हा आमच्यातले बांध तुटले तेव्हा समजलं की ते नॉर्थ इंडियन होतेही आणि नव्हतेही. आता गम्मत पहा. तो वास्तविक होता बंगाली पण बंगाल ही जन्मभूमी असलेला मारवाडी. त्यामुळे नवरा-वडील हिंदीमध्ये बोलत होते बंगाली भाषेचा लवलेशही कोठे नव्हता. आता नवरा-बायको बघूया. नवरा बंगाली पण मारवाडी हे तर समजलं, पण बायको कोण होती माहीत आहे? जर बायकोही बंगाली होती तर ते तिघेही बंगाली भाषेत बोलत असायला हवे होते. पण ती गोड खाणे या विषयावर जेव्हा थोडी बोलती झाली तेव्हा कळले की ती होती मल्लू, केरळची!

म्हणून नवरा-बायको संभाषणही हिंदी मध्ये चालू होते बंगालीत नाही. हा त्यांच्याविषयी माझा चुकलेला पहिला अंदाज.

अंदाज अपना अपना - चुकलेला दुसरा अंदाज

परत जरा सुरुवातीकडे जाऊया. एकूणच त्याचे बॅग विषयीचे उग्र, रोखठोक संभाषण, चेहऱ्यावरचे हावभाव, बायकोचा अलिप्तपणा आणि वडिलांची एकूण काया बघून आपली यात्रा सामसूम आणि एकमेकात सख्य फारसे होणे शक्य नाही अशी माझी समजूत झाली होती. पण झाले पूर्ण उलटे! तसं बघितलं तर बायकांमध्ये निरंतर बोलण्याची शक्ती असते आणि इच्छाही. तसं आणि तेवढं पुरुष बोलत नाही. पण इथे मी आणि तो एकदा बोलायला लागल्यावर त्याचा अंत राहिला नाही. शीतल आणि त्याची बायको दोघीही खिडकीच्या कोपऱ्यात बसून ऐकत होत्या किंवा आपापल्या कार्यात मग्न होत्या. शीतल पुस्तकात डोकं खुपसून बसली होती तर ती मल्लू ऑफिसच्या कामात व्यस्त होती. मी आणि तो बंगाली दोघांचाही एका विषयातून दुसरा विषय, एका आठवणीतून दुसरी आठवण, एका व्यक्तिकडून दुसरी व्यक्ती, कधी बंगाल कधी महाराष्ट्र तर कधी गुजरात, सर्व आठवणीत, प्रदेशात, आयुष्यात फिरून आलो. थोडक्यात विषयांना काही सीमा नव्हत्या, आणि वेळेचे काही बंधन नव्हते. संध्याकाळ कधी झाली कळलंही नाही. बाहेर हात धुवायला गेलो तर तोही तिथे आलेला. तिथेच उभ्या उभ्या आमचे बोलणे सुरु झालं.

जसे आम्ही, म्हणजे मी आणि तो नवरा बोलत गेलो तसं लक्षात आलं की तो एकदम मोकळेपणाने बोलणारा इसम होता. आणि त्यामुळेच त्याने येताक्षणी मोकळेपणाने बॅग हलवायला सांगितलं होतं.

तसेच तो स्वभावानेही साधा, सरळ होता. याचा अर्थ तो भोळा होता असं मुळीच नाही. तो IT क्षेत्रात होता आणि कामानिमित्त अनेक शहरात फिरावे लागत असल्यामुळे जगाचा अनुभवही होता. पण मनात एक आणि बोलण्यात दुसरंच अशी भानगड मुळीच नव्हती. वडिलांशी वागण्यात काळजी होती, तसंच बायकोचीही लहान सहन गोष्टींची काळजी घेत होता. उदा. मसाला डाळ विकणारा आला. त्याने दोन प्लेट डाळ घेतली पण आवर्जून एकात दुप्पट लिंबू पिळायला विक्रेत्याला सांगितलं, ते ही एकदा नव्हे तर दोन-तीनदा.

जेव्हा बायको "मुझे ज्यादा नीम चाहिये" म्हणत मसाला डाळ घेण्यास सरसावली तेव्हा त्याने दुसरी प्लेट तिच्या हातात ठेवली, "तू यह दाल ले, यह तेरे लिये है" म्हणत दुप्पट लिंबू पिळलेली डाळ तिला दिली.

अशाच छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तो घेत होता. ही गोष्ट शीतलच्या लक्षात आली आणि तिने त्या केरळच्या मुलीला हळूच सांगितलं, "मैं देख रही हूँ की वह आपका बहुत खयाल रखते है, छोटी छोटी चिजोंका भी देखते है." तिने होकारार्थी मान हलवल्याचे माझ्या लक्षात आले.

तर अशी होती ही विलक्षण द्वारका ते मुंबई रेल्वे प्रवास यात्रा. आता तुमच्याही लक्षात आलं असेल की सुरुवातीला नितीशच्या वागण्यावरून तो शिष्ट प्रवृत्तीचा वाटत होता. पण जशी जशी प्रवासात ओळख वाढत गेली, शब्दांची संख्या वाढत गेली तसा तसा तो शिष्ट नसून एकदम गप्पिष्ट प्रवृत्तीचा निघाला.

परत मुंबईला घरी आल्यावर बॅगेतून सामान उपसलं गेलं, नेहमीची आवराआवर झाली आणि मुंबईतल्या एका अल्पशा निवांत क्षणात शीतल एकदम व्यक्त झाली, "त्यांना आपण कसे वाटलो असू ना? एक शिष्ट आणि एक गप्पिष्ट! प्रवासात कमी बोलणारी  शीतल शिष्ट आणि या प्रवासात सतत बोलणारा धवल गप्पिष्ट!


तसं
लहानपणी माझं टोपण नाव '.' असं होतं. .. म्हणजे गळे पडू.
त्याच ग.प. चं या द्वारका-मुंबई प्रवासाकरिता नामकरण झालं गप्पिष्ट!

- धवल रामतीर्थकर


परतीचा प्रवास सुरु स्थळ: द्वारका रेल्वे स्थाकाबाहेर


प्रवासात माकडचेष्टा करण्यास मज्जाव नाही... मग ओम ला भीती कोणाची!